गायीचे डोळे करुण उभे की…

गायींच्या सहवासात तणाव विसरायचा आणि आनंदी व्हायचे, हा प्रयोग नवा नाही. मात्र, एकीकडे ‘व्हॅलेंटाइन डे’ने त्याचा एक टप्पा गाठला तर दुसरीकडे युरोप आणि अमेरिकेतून हे गोप्रेम नव्याने भारतात येते आहे…

सारंग दर्शने

यंदाचा १४ फेब्रुवारीचा ‘व्हॅलेंटाइन डे’ नेहेमीसारखा गेला नाही. करोनाचे संकट साऱ्या जगाला त्राहि भगवन् करून सोडतेच आहे. मात्र यंदा अमेरिकेतील अलाबामा राज्यात व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्ताने एक खास पॅकेज देण्यात आले. त्यात शेतात जाऊन दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद घेणे, वगैरे होतेच. पण खरे आकर्षण होते ते काऊ कडलिंगचे मराठीत सांगायचे तर गायीला कुरवाळण्याचे, आलिंगन देण्याचे. करोनामुळे हा दर फक्त पन्नास डॉलर ठेवण्यात आला होता. गायींच्या स्निग्ध सहवासात मन शांत करण्याची आणि मेंदूमध्ये आरोग्यवर्धक रासायनिक स्राव वाढविण्याची कल्पना पहिल्यांदा रुजली ती नेदरलँड्समध्ये. यालाही आता बराच काळ झाला. ‘लव्ह हार्मोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ऑक्सिटोसिन’ या अंत:स्रावाचे प्रमाण गायींच्या सहवासात कसे वाढते, याचेही बरेच प्रयोग नेदरलँड्स आणि इतरही देशांमध्ये झाले आहेत. बाळाला जवळ घेतल्यावर आईला होणारा निरामय आनंद हा ऑक्सिटोसिनचा सर्वोत्तम अवतार असतो. जवळपास तसा आनंद गायीच्या गळ्यात पडून आणि तिच्या कुशीत शिरून होऊ शकतो.

स्वित्झर्लंड हा तर गोपालकच देश आहे. तेथील चीज व इतर दुग्धोत्पादने जगभर नावाजली जातात. जीनिव्हात आणि आसपास अतिवृद्धांना किंवा गंभीर विकार झालेल्या ज्येष्ठांना दर काही दिवसांनी गायींच्या सहवासात नेण्याची एक थेरेपीच मूळ धरते आहे. अनेकदा वृद्ध या गोभेटीची वाट पाहात राहतात. काहींना तर व्हीलचेअरवरून उठताही येत नाही. पण त्यांना गायींना स्पर्श करण्याची ओढ लागलेली असते. बहुतेक इतर प्राण्यांप्रमाणे गायीच्या शरीराचे तापमान हे माणसापेक्षा अधिक असते. त्यामुळेच, प्राण्यांना केलेला स्पर्श उबदार वाटतो. मात्र, गाय आणि इतर प्राण्यांमधला फरक असा की, गाय असा मानवी स्पर्श अधिक उदारपणे स्वीकारते. गायीला किंवा कालवडीला जवळ घेतल्यानंतर निर्माण होणारी उब झपाझप संवेदना बदलून टाकतात. ‘स्ट्रेस’ म्हणजे मानसिक ताण हा आधुनिक माणसाचा सगळ्यांत मोठा शत्रू आहे. युरोपात गायींच्या सहवासात तणावमुक्तीचा सुखद अनुभव घेणारे शेकडो नागरिक सुटीच्या दिवशी शेतमळ्यांकडे, गोठ्यांकडे धाव घेत आहेत. गायीच्या हृदयाचे माणसापेक्षा मंदगतीने पडणारे ठोकेही माणसाला काहीसे शांत करण्यासाठी उपयुक्त ठरतात का, याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत.

मूळची नेदरलँड्सची असणारी सुझान वूलर्स न्यूयॉर्कमध्ये आली आणि तिने महानगराबाहेर ३३ एकरांचे शेत घेतले. गायी आणि घोड्यांचा मिळणारा सहवास हे तिच्या फार्मचे वैशिष्ट्य. सुझान सांगते की, ‘मांजर, श्वान किंवा मासे यांचा मन:शांतीसाठी किंवा तणावमुक्तीसाठी उपयोग गेली अनेक वर्षे केला जातो. अनेक मानसोपचार तज्ज्ञ तसा सल्लाही देतात. पण गाय किंवा अश्व हे माणसाचे किती मित्र बनू शकतात आणि ते माणसाला किती शांत, तणावमुक्त करू शकतात, हे आमच्या शेतावर आम्हाला रोज अनुभवास येते. आमच्या शेतावरच्या गायी खाऊन झाल्यावर आडव्या पडून रवंथ करतात; तो त्यांचा दिवसातला सर्वांत शांत, आनंदाचा काळ असतो. त्यावेळी आपण काहीही न करता त्यांच्याजवळ हलक्याशा स्पर्शात असणे, या जवळपास ध्यानावस्था लाभण्याचा अनुभव असतो.’

अमेरिकेत किंवा युरोपात कोणत्याही अनुभवाचे मूल्य हे शेवटी रोकडमार्गाने जात असल्याने नियमित ५० ते ७५ डॉलर गायींना भेटण्यासाठी खर्च करणे, हे अनेकांना विशेष वाटत नाही. त्यासाठीचा प्रवासही आवडतो. ‘हग अ काऊ’ हा ट्रेंड त्यामुळे झपाट्याने वाढतो आहे. गायींच्या सहवासात माणसांना बरे वाटते. पण त्यांना काय वाटते, हा प्रश्न होताच. नाहीतर, आपल्या आनंदासाठी गायींचा छळ का करायचा, हा नैतिक प्रश्न निर्माण होतो. यावरही वैज्ञानिकांनी बरेच प्रयोग केले. त्याचे रिसर्च पेपर प्रकाशित झाले आणि असे निष्कर्ष निघाले की, गायींना पाठीवर किंवा मानेजवळ, कानापाशी, कपाळावर प्रेमाने केलेला स्पर्श नुसता कळत नाही, तर कमालीचा रुचतो. त्याही अशा स्पर्शांनी सुखावतात. कदाचित् अशा सुखावलेल्या गायी आणि त्यांच्यामुळे तणावमुक्त होणारी माणसे यांची काही शब्दातीत केमिस्ट्री काम करू लागत असेल. ‘गायी तुम्हाला प्रश्न विचारून सतावत नाहीत. मात्र, त्या तुमच्या सोबत असतात आणि तुमच्या प्रेमाला प्रतिसाद देतात, हेच ताण कमी करणारे असते,’ असा युरोपात गोशाळा चालविणाऱ्यांचा अनुभव आहे.

भारत आणि गाय हे नाते निराळे सांगायला नको. मात्र, नेदरलँड्समध्ये जन्माला आलेला हा गोप्रेमाचा अध्याय युरोप आणि अमेरिकेत स्थिरावून आता भारतात आला आहे. हरयाणात गुरुग्राम येथे काही दिवसांपूर्वीच एका स्वयंसेवी संस्थेने ‘तणावमुक्तीसाठी गो-सहवास’ हा प्रयोग सुरू केला आहे. गायीचे डोळे करुण उभे की सांज निळाईतले.. असे लिहिणाऱ्या कवीच्या प्रतिभेला हा गो-साक्षात्कार आधीच झाला असणार!

(हा ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘आयफेल टॉवर’ या सदरात शनिवार, सहा मार्च, २०२१ रोजी प्रकाशित झालेला लेख आहे. आपण तो इतरांना पाठवू शकता.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *