महाराष्ट्र प्रांतातील ब्राह्मण

विविध प्राचीन धर्मशास्त्र ग्रंथाच्या आधारे वर्णिले आहे की, सत्ययुगात फक्त एकच ब्राह्मण वर्ण होता. कृतयुगात आणि पुढे त्रेता युगात चार वर्ण अस्तित्वात आले. कलियुगात एक ब्राह्मण वर्णाच्या देशकालपरत्वे, वेदशाखा नुसार अनेक पोटशाखा अस्तित्वात आल्या. प्रथम गौड आणि द्रविड असे 2 भेद झाले.
नंतर पंच द्रविड ( दक्षिण भारत – तैलंग, महाराष्ट्र, गुर्जर, द्रविन, कर्नाटका )
आणि पंच गौड ( उत्तर भारत – सारस्वत, कान्याकुब्ज, गौड, मैथिल, उत्कल )असे भाग झाले, त्यानंतर विविध शाखा निर्माण झाल्या. (संपूर्ण भारतात असलेले एकूण ज्ञात 350 ब्राह्मण शाखा आहेत)

कर्णाटकाश्च तैलंगा द्राविडा महाराष्ट्रकाः ।गुर्जराश्चेति पञ्चैव द्राविडा विन्ध्यदक्षिणे ॥सारस्वताः कान्यकुब्जा गौडा उत्कलमैथिलाः ।पन्चगौडा इति ख्याता विन्धस्योत्तरवासिनः ॥

आज जरी विविध ब्राह्मण जाती एक होत आहेत, तरी आधीच्या काळात तसे नव्हते.

विविध हिंदु साम्राज्य राजसत्ता, आणि पेशव्यांच्या काळात या ब्राह्मण पोटशाखात धार्मिक वर्चस्व ठेवण्यावरून आपापसात फार तंटेबखेडे उत्पन्न झाले आणि जगदगुरू शंकराचार्य यांच्या करवीर आणि शृंगेरी पीठाने ते सोडविले आहेत. मात्र ब्राह्मण पोटजातीतील आपसातील भेदामुळे सर्वच समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

🌹अथर्वण ब्राह्मण – हे महाराष्ट्रांत कोठे कोठे क्वचित आहेत. जे आहेत ते अध्ययन व पौरोहित्य यांच्या अनुपपत्तीमुळे पूर्ण ऋग्वेद देशस्थ बनले असून आडनावालाच अथर्वण राहिले आहेत. तरीही काही अथर्ववेदी ब्राह्मण सांगली कडील भागात आहेत.

🌹उत्तर कोंकणस्थ माध्यंदिन – हे ब्राह्मण मूळचे देवगिरी (मराठवाडा) प्रांतातील आहेत. अल्लउद्दीन खिलजीने देवगिरी वर स्वारी केल्याने राजपुत्र बिंबराजाबरोबर राजपुरोहित पुरुषोत्तम पंत काव्य या नावाचा शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण उत्तर कोंकणात आला. रामदेवरायाने आपला पुत्र बिंबराज यास काही निवडक मंडळीसह उत्तर कोंकणात वंशरक्षणार्थ व स्थिरस्थावर करण्याकरिता पाठविले होते. बिंबराजाने थोडक्याच दिवसात कोकणात आपला अम्मल चांगलाच बसविला. त्या कामी पुरुषोत्तम पंताची चांगली मदत झाली. म्हणून बिंबराजाच्या मध्यस्थीने उत्तर कोकणातील जोशी वृत्ती विकत घेतली व ती स्वकीयी आप्तांस वाटून दिली. या वृत्तीमुळे शे दोनशे कुटुंब उत्तर कोकणात वैद्यक, ज्योतिष व जोशीपणाची वृत्ति यांवर राहू लागली. पोर्तुगीजांनी हिंदू लोकांचा छळ मांडल्यावर या यजुर्वेद्यांनी हिंदुत्वरक्षणाकरिता जिवापाड श्रम करून भ्रष्ट झालेली कुटुंब शुद्ध करून घेतली. या वेळेपासून चित्पावन उत्तर कोंकणात येऊ लागले. त्यांचा व यजुर्वेद्यांचा पंक्तिव्यवहार होत नसे. कारण त्या वेळी चित्पावनांबद्दल विपरीत समजुती होत्या. यजुर्वेदी हे वृत्तिबंत, अधिकारी वै आपल्या पक्तीस न बसणारे हे पाहून चित्पाननांनी वृत्तिहरणाकरता हे ब्राह्मण नाहीत असे ठरविण्याचा यत्न सन १७४७ त प्रथम केला. पण त्यास यश आले नाही. उत्तर कोकणातील शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण आणि देशावरील सर्व यजुर्वेदी ब्राह्मण है एकच आहेत याबद्दल आता शंका राहिलेली नाही.

🌹कण्व ब्राह्मण – या ब्राह्मणांची पश्चिम महाराष्ट्रात तुरळक वस्ती आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भात मुख्यत्वे करून मोठया प्रमाणात आढळतात. बहुतेक लोकांचे माहूरची रेणुकादेवी हे मुख्य दैवत आहे. महर्षी कण्व पासून शाखा उत्पन्न झाल्याचे मानतात. हे शुक्ल यजुर्वेदी आहेत कण्व शाखेचे अनुयायी आहेत. कात्यायन श्रौतसूत्र प्रमाणे यांची धर्मकर्मे होतात. कण्व व काण्णव हीं उपनांवें यापासून झालीं आहेत . जरी कण्व ब्राह्मण हे यजुर्वेद कण्व शाखीय असले तरी ऋग्वेदाच्या 8 व्या मण्डलाच्या चौथे सुक्तात कण्व-गोत्र दिलेले आहेत.

🌹कऱ्हाडे ब्राह्मण – हे ऋग्वेदी शाकलशाखाध्यायी होत. त्यांची धर्मकर्मे आश्वलायन सूत्राप्रमाणे होतात. ह्या जातीत विविध कार्यक्षेत्रांत कर्ते पुरुष निर्माण झाले असून महाराष्ट्रlत ज्या जाती सर्वात पुढारलेल्या आहेत त्यात तिची गणना होते.

🌹कात्यायन ब्राह्मण – अथवा कास्त हे मुळचे देवगिरीचे. अल्लाउद्दीनाच्या स्वारीच्या हाहा:कारांत ते मुंबई – महाराष्ट्रांत घुसले. ह्यांची लोकसंख्या अल्प असून ती बृहन्महाराष्ट्रात विखुरलेली आहे. हे लोक पूर्वी यादवांच्या राजवटीत शेती करून निर्वाह करीत. कास्त किंवा कास्तकारी म्हणजे शेतकरी असा अर्थ मध्यप्रांत, वऱ्हाड व निजामसंस्थांनात रूढ आहे. कास्त हा शब्द व्यवसायवाचक आहे. किस्ती ब्राह्मणांप्रमाणे कास्त ब्राह्मण हेही धन्देवाचक नाव आहे. पराशर स्मृतीमध्ये शेतीचे विधान केले असून साक्षात् वा परंपरेने शेतीवर निर्वाह करणारे ब्राह्मण बृहन्महाराष्ट्रात आहेत.
कात्यायन यजुर्वेद माध्यंदिनशाखानुयायी आहेत. ते मुख्यत्वेकरून शेती करून उदरनिर्वाह करतात. काही सरकारी नोकरीत आहेत व काही व्यापार करतात. कात्यायनांस इतर महाराष्ट्र ब्राह्मण कमी लेखतात. पण शके १८४४ मध्ये संकेश्वर पीठाने ते भोजनप्रीतिभोजनास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे.

🌹किस्ती ब्राह्मण – अथवा रणावट खानदेश व-हाडांत व नगर जिल्ह्यात आढळतात. त्यांचे किस्ती हे नाव व्याजबट्याच्या धंद्यावरून पडलेले आहे. यामुळे व इतर महाराष्ट्र ब्राह्मणांहून यांचे आचार थोडेसे भिन्न असल्यामुळे ह्यांस कमी समजण्यात येते. परंतु पुष्कळ सामान्य ब्राह्मण व्याजबट्याचा धंदा करीत असल्यामुळे व देशपरत्वे आचारही बदलत असल्यामुळे या जातीस कमी समजणे योग्य दिसत नाही; व शके १८३२ श्रीमच्छकराचार्य मठ संकेश्वर व शिवगंगा यांनीही हे ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन असून पंक्तिपावन आहेत असा स्पष्ट निर्णय दिला आहे

🌹गोवर्धन ब्राह्मण – हे बृहन्महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. हे ब्राह्मण मूळ गोवर्धन प्रांतात राहात असल्यामुळे त्यांस गोवर्धन असे प्रादेशिक नाव पडले. ते उत्तरेकडील क्षत्रियांबरोबर दक्षिणेत आले. राजगुरू व राजपुरोहित नात्याने त्यांचे वर्चस्व उत्तर कोकणात व नाशिकच्या आसपासच्या भागांत पुष्कळ आहे. गोवर्धन ही पंचद्राविडातील एक पोटजात असून ती पूर्ण शाकाहारी आहे.
गोवर्धन ब्राह्मण हे ऋग्वेद शाकल शाखा, कृष्ण यजुर्वेद तैत्तिरीय शाखा, शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा व सामवेद छंदोग्य शाखा इतक्या मध्ये विभागली आहे.

🌹चरक ब्राह्मण – चरक शाखेची वस्ती मध्यप्रांतांत विशेष आढळून येते. पुष्कळ अज्ञानी लोकांस चरक ही शाखाच ठाऊक नसल्यामुळे त्यांच्या ब्राह्मण्याविषयी देखील संशय प्रदर्शित केला गेला आहे. चरक हे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण आहेत. चरकांतील भेद जो कठ त्या कठांची संहिताही प्रसिद्ध आहे. भागवतामध्ये वैशंपायन, याज्ञवल्क्य यांच्या भांडणापूर्वी जे वैशंपायनाचे शिष्य होते त्या सर्वासच चरकाध्व’ असे म्हटले आहे.

🌹चित्पावन ब्राह्मण – कोकणस्थ म्हणजे चित्पावन अशी हल्ली चुकीची समजूत झालेली आहे. वास्तविक कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये चित्पावन, देवरुखे, क्रमवंत, कऱ्हाडे, जवळ कुडाळदेशकर, सारस्वत इत्यादी सर्व ब्राह्मण येतात. कोकणस्थ शब्दाच्या जागी मुद्दाम चित्पावन ब्राह्मण असे म्हटले आहे. चित्पावन ब्राह्मण हा अग्रणी समजला जातो.
परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केली, त्या संहाराबद्दल परशुरामाला यज्ञाचे प्रायश्चित ध्यावेसे बाटले, पण यज्ञ करण्यास ब्राह्मण मिळेनात म्हणून त्याला चिंता पडली. इतक्यात जहाज फुटल्यामुळे काही प्रेते वाहात येत आहेत असे परशुरामाने सह्याद्रीच्या टेकडीवरून पाहिले.त्या प्रेतांना त्याने जिवंत करून ब्राह्मणधर्म शिकविला आणि त्या १४ प्रेतापासून उत्पन्न केलेल्या ब्राह्मणांना समुद्र हटवून जागा करून दिली. ती जागा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील वशिष्ठी नदीकाठचा ४० मैलाचा किनारा ही होय. वाशिष्ठी व शिव या दोन नद्यांच्या पुलिनांवर म्हणजे चिपळूण येथे कोकणस्थांची वसाहत झाली.

समुद्रतीरी परशुराम स्नानास गेला असता काही मानल अचानक त्याच्या दृष्टीस पडली. परशुरामाने त्याची विचारपूस केली. त्यानी ‘आम्ही कोळी आहोत; मासे मारण्याचे कामी कुशल आहोत. समुद्रतीरी राहातो.’ अशी उत्तरे दिली. परशुरामाने त्यांच्या जाळ्यांची जानवी करून दिली आणि साठ कुळे पवित्र केली. चितास्थानी पवित्र केल्यामूळे ‘चित्पावन’ असे नाव प्राप्त झाले. असा सह्याद्रिखंडाचा निष्कर्ष आहे. आधार घेऊन ‘चित्त पोळलेले म्हणजे चित्तपावन’ असेही म्हणतात.
केरलाश्च तुलिङगाश्च तथा सौराष्ट्रवासिनः कोंकणाश्च कुडालाश्च वरालाटाञ्च बर्बराः ।।

चित्पावन यांचे अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी हे कुलदैवत.
चित्तपावन हा चित्तपावन शब्दाचा अपभ्रंश. मुख्य मुद्दा इतका की, पर्शुरामाने आणिलेले १४ ब्राह्मण हे वैदिक धर्माप्रमाणे वागणारे व यज्ञयागादी करणारे होते. चिपळूणपासून ३ मैलावर ‘पर्शुराम’ नावाचा पर्वत आहे, तेथे भार्गवरामाचे देवालय आहे. चित्पावन जे कोकणात उतरले ते दाभोळच्या खाडीतून परशुराम पर्वतावर येऊन राहिले. या पर्वताच्या पायथ्याशी आसपास वस्ती करून राहणाऱ्या चित्पावन ब्राह्मणावरून त्या भूमीला ‘चित्यपावन भूमी’ अशी संज्ञा पडली. सुमारे तीन हाजार अठ्याऐंशी वर्षापूर्वी चित्पावन ब्राह्मण कोकणात आले ते अग्निचयन करणारे होते; म्हणजे गृहस्थ होते. अग्निहोत्र्यांना यजमानीण प्राण: अवश्य लागते. चित्पावनांचे पुरुष दैवत ‘परशुराम’ व स्त्रीदैवत ‘जोगेश्वरी’ होय. चित्पावन पुरुष जसे परशुरामाचे तशा मूळ चित्पावन स्त्रिया जोगाईच्या आंब्याच्या असाव्यात. “जोगाईच्या आंब्याजवळच्या १४ गोत्रांच्या १४ ब्राह्मणांकरिता स्त्रिया आणल्या. त्यांनी जोगेश्वरी ही आमची कुलस्वामिनी असा आग्रह धरिला.” निजामच्या हद्दीतील आंब्याची जोगेश्वरी ही कोंकणासारख्या दूर प्रदेशातील चितपावनांची कुलस्वामिनी कशी झाली हे एक गूढच आहे.

चित्पावन ब्राह्मण हे कृष्णयजुर्वेदी तैत्तिरीय शाखेचे असावेत व पुढे काही कारणामुळे चित्पावन ऋग्वेदी बनले असे एक मत आहे. सांप्रत ऋग्वेद शाकलशाखा आणि कृष्णयजुर्वेद तैत्तिरीयशाखा ह्याच काय त्या चित्पावनांमध्ये आढळतात. आश्वलायन व सत्याषाढ वा हिरण्यकेशी सूत्रानुसार ह्यांची धर्मकर्मे होतात.

🌹जवळ ब्राह्मण – किंवा खात मुख्यत्वेकरून रत्नागिरी जिल्ह्यात आडळतात. ही जात मूळची दक्षिण हिंदुस्थानातली असून उत्पात अगर राज कर्तृत्व जुलूम यामुळेच ती गलबतात बसून मुलांमाणसांसह दापोली तालुक्यात बुरोडी नजीक आली. वादळाच्या प्रहाराने गलबतांचे तुकडे तुकडे झाले असता त्या वादळातून म्हणजे जवळातून (कोकणात वादळास जवळ म्हणतात) ही जात बचावली म्हणून जवळ असे नाव पडले. पखांतातून आलेल्या या जातीच्या सद्ब्राह्मण्याबद्दल ब्राह्मणांना शंका वाटली म्हणून ते त्यांच्याशी भोजनव्यवहार करीतात, पेशवाईतील प्रसिद्ध सरदार हरिपंत तात्या फडके यांनी यांची उपनयने व श्रावण्या करवून यांना आपल्या घरी देवघरापर्यंत निरनिराळ्या अधिकारावर नेमले. तेव्हापासून यांचे सब्रह्मण्या मान्य झाले. जवळ ब्राह्मण ऋग्वेदी शाकलशाखी आहेत. त्यांची धर्मकर्मे आश्वलायन सूत्राप्रमाणे होतात. ते मुख्यत्वेकरून शेतीचा धंदा करीतात.

🌹जंबू कण्व ब्राह्मण – ह्यांची थोडीशी वस्ती अहमदनगर जिल्ह्यात आहे, पण यांवा मुख्य भरणा मध्यप्रांतात आहे. ही जात मूळची उत्तर गुजराथेतील असून मुसलमानी उत्पातामुळे मध्यप्रांताकडे सरकली आटे नेमाडात जंबू ब्राह्मण नार्मदीय ब्राह्मणांच्या खालोखाल आहेत. जंबू शहरावरून जंबू ब्राह्मण, किंवा जांबवतीशी याज्ञवल्क्याने लग्न लाविल्यामुळे त्या संततीला हे नाव मिळाले, असे कोणी म्हणतात. काही असले तरी नेमाडातील अथवा गुजरातेतील पंचद्राविडातील एक जंबू ब्राह्मणसमूह मध्यप्रांतात सुमारे दोनशे वर्षापूर्वी आला यात शंका नाही. भडोच, अहमदाबाद, सुरत या भागांशी व थोडासा अहमदनगर जिल्ह्याशी यांच्या धाग्यादोऱ्याचा संबंध पोहोचतो. हे ब्राह्मण पंचद्राविड असून सर्व शाकाहारी आहेत. हे ब्राह्मण मूळचे गुजराती असले तरी त्यांचे गुजराती आचारविचार आता अवशिष्ट नाहीत. मध्यप्रांतातील दक्षिणी ब्राह्मणांशी यांचा राजरोस अन्न व्यवहार होतो. है ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी कण्व शाखीय असून यांची धर्म कर्म कात्यायन श्रौतसूत्र प्रमाणे होतात.
ते व्यापार व व्याज बट्ट्याचा धंदा करून पोट भरतात.

🌹 तिरगूळ ब्राह्मण – अथवा तैत्तिरीय आपस्तंब या जातीचे मूलस्थान आंध्रप्रदेशातील सप्तगोदा प्रदेश बिझवाडा, राजमेहेंद्री हा तैलंगणाचा भाग होय. टिपूचा छळ आणि दैवी आपत्ती यांमुळे या लोकांनी आपला देश सोडला व ते जीव बचावण्यासाठी व पोट भरण्यासाठी निरनिराळ्या प्रांतांत धुसले. मुंबई महाराष्ट्रात, कोकण भाग सोडून यांची वस्ती विशेष आहे. हे लोक महाराष्ट्रात पानमळ्यांचा धंदा करू लागले. त्यामुळे पानांवरील कीड हे ब्राह्मण मारतात असा आक्षेप त्यांजवर ठेवून इतर ब्राह्मण त्यांस कमी लेखू लागले. शिवाय भाषा भिन्नत्व व आचारभिन्नत्व यामुळेही यांच्याविषयी गैरसमजुतीस कारण झाले. त्यातच भिक्षुकी मत्सराची भर पडली. तथापि या जातीने अनेक विद्वान् शास्त्री, पंडित, श्री शृंगेरी, श्री हंपी विरूपाक्ष, श्री उत्तराधि व राघवेंद्र वगैरे मठाधिपती शांकर व माध्वमतानुयायी पीठांकडून, अनुकूल निर्णय मिळवून वरील सर्व आक्षेपांचे वैयर्थ सिद्ध केले आहे.
तिरगूळ कृष्णयजुर्वेदी तैत्तिरीय शाखा आहेत. त्यांच्यात पुष्कळ स्मार्त व थोडे वैष्णवही आहेत. ते सर्व शाकाहारी आहेत.

🌹देवरुखे ब्राह्मण – मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात व मुंबई शहरात आढंळतात. या जातीचे मूळस्थान कोल्हापूर, विशाळगड, संगमेश्वर हा भाग असावा. देवरुखे या नावावरून देवराष्ट्र म्हणजे कृष्णा नदीच्या पूर्व बाजूचा प्रदेश, अर्थात् तेथील ते देवराष्ट्रीय ब्राह्मण असे कोणी अनुमान करीतात. परंतु प्रबळ प्रमाणांच्या अभावी हे अनुमान लंगडे पडते. कन्हाड्यांप्रमाणे देवरुखे सुद्धा मूळचे देशस्थ असाही एक समज आहे. त्यांचे देशस्थांशी आजपर्यंत बरेच विवाह झाले आहेत. ऋग्वेद शाकलशाखा व कृष्ण यजुर्वेदी तैत्तिरीय शाखा अशा दोन्ही शाखांचे ब्राह्मण या जातीत आहेत. हे मुख्यत: शेती करून उदरनिर्वाह करीतात. काही व्यापार करीतात व काही सरकारी नोकरीत आहेत.

🌹देशस्थ ब्राह्मण – हे बृहन्महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. महाराष्ट्र प्रांतात सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे ब्राह्मण आहेत. देशावर राहणारे ते देशस्थ अशी देशस्थ शब्दाची व्युत्पत्ती करण्यात येते. ह्या ब्राह्मणांचा प्राचीन इतिहास उपलब्ध नाही. तथापि विंध्य पर्वताच्या उत्तरेकडून इतर सर्व ब्राह्मणांच्या पूर्वी हे महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले असे अनुमान आहे. यांच्यात स्मार्त आणि वैष्णव असे दोन पोटभेद आहेत. त्यांच्यात क्वचित परस्पर विवाहसंबंध होतो. देशस्थ ऋग्वेदी शाकलशाखीय असून त्यांची धर्मकर्मे आश्वलायन सूत्राप्रमाणे होतात. शाकल आणि बाष्कल शाखा ही आहेत. देशस्थ सर्व प्रकारचे व्यवसाय करीतात तथापि याज्ञकी करणे , आणि बहुतांशी मंदिरांचे पुजारी आहेत. मुख्य दक्षिण महाराष्ट्रातील, मराठवाडा तील बहुतेक कुळकर्णी याच जातीचे आहेत. शुक्ल यजुर्वेदी आपस्तंभ शाखेचे बांधव देशस्थ यजुर्वेदी म्हणवतात. देशस्थ वैदिक धर्माप्रमाणे वागणारे व यज्ञयागादी करणारे आहेत. धर्म क्षेत्रात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. पेशवेच्या राज्य काळात चित्पावन ब्राह्मण खालोखाल देशस्थ ब्राह्मण यांना मोठा मानमतराब होता.

🌹नार्मदीय – यांची मुख्य वस्ती नेमाडात आहे. तेथून हे बऱ्याच वर्षांपूर्वी खानदेश, वऱ्हाड, मध्यप्रांतात आले. यांच्याशी माध्यंदिन ब्राह्मणांचे व इतर द्रविडांचे भोजनप्रतिभोजन व्यवहार होतात. हे शुक्ल यजुर्वेदी जाबाल शाखीय आहेत. पण ही वास्तविक स्वतंत्र जात नाही. गोव्यातील कन्हाडे ब्राह्मणांस पये असे नाव आहे. परंतु महाराष्ट्रातील कन्हाड्यांशी त्यांचा संबंध होतो असे दिसत नाही.

🌹पल्लेवाळ – ह्यांची वस्ती खानदेश बन्हाणपुराकडे थोडीशी आहे. हे मूळचे गुजरातेतले, पण यांचे आचारविचार सर्व महाराष्ट्रीय ब्राह्मणांप्रमाणे आहेत. हे शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन शाखा आहेत. भट्ट प्रभू – ही जात पद्यांतील म्हणजे कन्हाड्यांतील एक पोटभेद आहे. त्यांची। वस्ती फक्त गोमंतकात आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी ह्या जातीला एका क्षुल्लक कारणावरून बहिष्कृत करण्यात आले. यांचे आचारविचार कन्हाड्यांप्रमाणेच आहेत. अलीकडे पुष्कळ पद्ये ब्राह्मण यांच्याशी भोजनप्रतिभोजनाला प्रवृत्त झाले असून लवकरच है आपल्या मूळ जातीत समाविष्ट होतील असे चिन्हे दिसतात.

🌹मैत्रायणी – मैत्रायणी ही कृष्ण यजुर्वेदाची शाखा आहे. या शाखेचे ब्राह्मण हल्ली नाशिक, पूर्व खानदेश, बन्हाणपूर, भंडारा, नागपूर भागात आहेत. या शाखेच्या सात भेदांपैकी फक्त मानवसूत्री व वाराहसूत्री ब्राह्मण शिल्लक आहेत. पूर्वी या दोन ब्राह्मणांमध्ये परस्पर व्यवहार होत नसे.

🌹वाज माध्यंदिन ब्राह्मण – यांची वस्ती खानदेश, वऱ्हाड व मध्यप्रांत येथे आहे. यांना आभीर म्हणजे कोळ्यांपासून केलेले ब्राह्मण असे म्हणून हिणविण्यात येत असे. पण यांचे सद्ब्राह्मण्य आता मान्य झाले अंसून त्यांचे व इतर माध्यंदिनाचे आता शरीरसंबंधही होऊ लागले आहेत.

🌹सहवासी ब्राह्मण – वैष्णव ब्राह्मण मध्ये वैष्णव असा एक पोटभेद आहे. ही जात कर्नाटकात टिपू सुलतानाच्या उत्पातामुळे महाराष्ट्रात आले. ब्राह्मणोत्पत्तिमार्ंड या ग्रंथात यांची गणना कर्नाटक ब्राह्मण्यात केली आहे. यांची वस्ती हावेरी, म्हैसूर, हुबळी, अध्वनी या कर्नाटक भागात बरीच आहे. हे ब्राह्मण ऋग्वेद-शाकल-शाखी आहेत. आश्वलायन सूत्राधारे यांची धर्मकर्मे होतात. या जातीतून विविध क्षेत्रांत कर्ती माणसे चमकत आहेत.
🌹सामवेदी ब्राह्मण – मुख्यत्वेकरून ठाणे जिल्ह्यात आढळतात. त्यांच्या पानमळ्यांच्या
व्यवसायामुळे आणि दुसऱ्या काही कारणांमुळे आपल्या शेजारच्या ऋग्वेदी व यजुर्वेद्यांशी ते एकरूप होऊ लागले आहेत.

🌹सारस्वत ब्राह्मण- गोमांतक, महाराष्ट्र, दक्षिण व उत्तर कानडा, मलबार व बृहन्महाराष्ट्रातील इतर ठिकाणी आढळतात. हे ब्राह्मण मूळचे आर्यावर्तातील, हे सरस्वती नदीच्या काठी राहात असत.
एकदा बारा वर्षांचे अवर्षण पडले असता अन्नोदकाभावी हाहा:कार उडाला. त्या वेळी र्ग व विद्या यांचा लोप झाला. तरीही आपत्तीत दधिचीपुत्र सारस्वत ऋषीने सरस्वती नदीतून रोज एक मत्स्य घेऊन त्यावर उदरनिर्वाह केला व वेदविद्या जगविली. पुढे याच ऋषीने दुष्काळानंतर सर्वत्र वेदविद्येचा प्रसार केला. सारस्वत ऋषीच्या शिष्यांना व वंशजांना या ऋषीच्या नावावरून सारस्वत हे नाव पडले. सारस्वत ब्राह्मणाची वस्ती पंजाब, काश्मीर, सिंध, बंगाल व गुजरातेत अद्यापि आहे. उत्तरेकडील या सारस्वतांना दक्षिणेत श्री परशुरामाने आणले. अशीही आख्यायिका आहे. पृथ्वी निक्षत्रीय करून दान दिल्यावन श्री परशुरामाने समुद्र हटवून सह्याद्रीच्या पश्चिमेस नवीन भूमी संपादन केली. तिला परशुराम क्षेत्र म्हणतात. तेथे दिग्विजयार्थ परशुरामाने केलेल्या यज्ञाला गौड देशाहून दशगोत्री सारस्वत आले होते. यज्ञानंतर त्यांना गोमांतक प्रांतात
अष्टयाम यांचा अग्रहार देऊन राहण्यास सांगितले. तेव्हापासून हे ब्राह्मण गोमांतकात राहिले असे संभवते. महाराष्ट्र आणि गुजराती सारस्वत मूळात जरी एक असले तरी त्यांचा कोणत्याही प्रकारे परस्परांशी संबंध नाही. त्यांचे आचारविचारही भिन्न असून त्या दोन अगदी स्वतंत्र जाती आहेत. गुजराती सारस्वतांचे वर्णन वर दिलेच आहे.
या जातीस सारस्वत ब्राह्मण, गौड ब्राह्मण, सारस्वत गौड़ ब्राह्मण, त्रिहोत्र ब्राह्मण, कोकणी ब्राह्मण अशी नावे आहेत.
हे सर्व ब्राह्मण मूळचे स्मार्त होते. पुढे काही वैष्णव झाले. यांच्या मुख्य गुरुपीठास कैवल्यम म्हणतात. याशिवाय चित्रापूर, काशीमठ, गोकर्णमठ, असे स्मार्त वैष्णव मठ आहेत. सारस्वतांचे पुरोहित बहुतेक सारस्वत आहेत ते अब्राह्मणांचे पौरोहित्य करणे अधर्म्य समजतात. वृत्ती असेल तर इतर ब्राह्मणांना त्या कामावर नेमतात. पूर्वी हे ब्राह्मण चतुर्वेदी असावेत. सांप्रत ऋग्वेद शाकल शाखेचेच सर्व अनुयायी आहेत. आबीयन सूत्राप्रमाणे धर्मकर्मे होतात. मंगेश, शांतादुर्गा, महालक्ष्मी, रामनाथ, मंगेश, अशी यांची पूज्य देवस्थाने गोमांतकात आहेत.
सारस्वतात गुप्तरीत्या मत्स्याहार आहे. धर्मकृत्ये, हव्यकव्य, श्राद्धपक्ष इत्यादी प्रसंगी मत्स्याहार वर्ज्य आहे.

🌹गौड ब्राह्मण – पंचगौडांतर्गत गौडांतील कुडाळदेशकर ब्राह्मण ह्या नावाची एकच जात मुंबई इलाख्यात आहे. कुडाळदेशकर ब्राह्मण – ह्यांचे दुसरे नाव आद्यगौड असे आहे. हे ब्राह्मण महंमद गजनीच्या उत्पाताच्या वेळी १०१७ मध्ये दक्षिणेत कुडाळ प्रांतात आले. कुडाळदेशकरांचा मूळ पुरुष सामंत प्रभू नामक एक ब्राह्मण असून तो कनोजच्या राजाचा मांडलिक होता. त्याने उत्पाताच्या वेळी द्क्षिणेतील सम्राट महामंडलेश्वर याचा आश्रय केला. कदंबाच्या आश्रयाने सामंत प्रभू घराण्यातील देशाच्या ज्ञातिबांधवांनी राजाश्रयाने साळशी महालात व कालांतराने कुडाळ प्रांतातील उत्कृष्ट भागात कायमची वसाहत केली. कालांतराने कोकणप्रांतात यादवांच्या ताब्यात गेला या अत्यंत अवनत काळात कुडाळदेशकर ब्राह्मणांची वस्ती आजरे, बेळगाव, धारवाड, विजापूर, कोल्हापूर, वसई, आरनाळा, मोगरनाड या भागात पसरली.
कुडाळदेशकर ब्राह्मण हे मूळचे गौड व शुक्ल यजुर्वेदी. परंतु दक्षिणेत आल्यावर क्षात्रवृत्ती स्वीकारल्यामुळे यांचे पौरोहित्य कन्हाड्यांकडे गेले. अर्थात् पुरोहितांचा ऋग्वेद । ज्ञातीत आला. सांप्रत कुडाळदेशकर ब्राह्मण ऋग्वेद शाकलशाखीय व आश्वलायन सूत्र आहेत. हे सर्व ब्राह्मण स्मार्तशंकर अद्वैतमतानुयायी आहेत. यांची मठपरंपरा स्वतंत्र असून अद्याप शुद्ध व उज्ज्वल अशी आहे. सारस्वत ब्राह्मण प्रमाणे या जातींत मत्स्याहार गुप्तरीत्या रूढ आहे. देव धर्म, आद्धकर्मे, उपासतपास अशा धार्मिक दिवशी तो आहार आवर्जून टाळण्यात येतो. कुडाळदेशकर ब्राह्मणांचा आणि सारस्वतांचा परस्पर भोजन व्यवहार होतो.

🌹कर्नाटक – कर्नाटक ब्राह्मण फक्त कानडा जिल्ह्यात आढळतात. ते कृष्ण
यजुर्वेदी बोधायनसूत्री आहेत. त्यांचा सामाजिक दर्जा हविकांप्रमाणेच आहेत. परंतु विक आणि कर्नाटक ब्राह्मण यांचा परस्पर अन्न-लग्नव्यवहार होत नाही. ते पौरोहित्य आणि शेती करून उदरनिर्वाह करीतात.

🌹विश्वब्राह्मण :- यांना पंचाल ब्राह्मण किंवा विश्वकर्मा ब्राह्मण असेंहि म्हणतात. ही भारतातील प्राचीन ब्राह्मण जात असून संपुर्ण भारतात कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या नांवाने आढळून येते. चारही वेदशाखा आणि पाचवी प्रणववेद ही प्राचीन वेदशाखा यांचें मधेच दिसून येते. असे असले तरीही पौरोहित्य, याज्ञीकी, ज्योतिष शास्त्र, हे पारंपरिक धर्म आचरण केले जाते. या शिवाय उपजीविका साठी शेती , भिक्षुकी वा अन्य व्यवसाय न करता अथर्ववेद चा उपवेद शिल्पवेद प्रमाणे देवशिल्पी मूर्ती , मंदिरे, मूर्ती प्रतिष्ठापना व तत्सम शिल्प कार्य या ज्ञाती कडून प्राचीन काळापासून अद्यापही केले जाते.

विश्वब्राह्मण जातीस वेदशास्त्रीय ग्रंथांत रथकार, ऐतश, कवी, मेधावी, नाराशंस, स्थपति इ. नांवें आहेत. देवयज्ञिय शिल्पकर्माचें आधिपत्य विराट पंचमुखी विश्वकर्म्याकडे होतें. विराट पंचमुखी विश्वकर्मा या पासून आपली उत्पत्ती झाल्याचे मानतात. पुरुषसुक्त यास आधार मानले जाते. त्याच्या नांवावरूनच या जातीस विश्वब्राह्मण असें नांव पडलें आहे. ‘पंचाल ब्राह्मण’ दैवज्ञ ब्राह्मण व ‘आचार्य’ अशीहि दुसरीं ज्ञातिनामें आहेत. देवमूर्तिशिल्पाचा र्‍हास होऊ लागल्यामुळें या ज्ञातीचा देवमूर्तिप्रतिष्ठावृत्तीचाहि लोप होत गेला. तथापि कालमानपरत्वें अद्यापहि कांहीं ठिकाणीं या ज्ञातीकडेसच परंपरागत देव शिल्पी मूर्ती तयार करणे व त्याची देवप्रतिष्ठापना व अर्चा करण्याचा हक्क चालू आहे.

जातीचीं देवळें, चा दक्षिणेकडे कर्नाटकात या ज्ञातीची स्वतंत्र प्राचीन 3 शंकराचार्य जगदगुरू पीठ आहेत. जगद्गुरू आद्य शंकराचार्य हे या ज्ञातीचे असल्याचे त्यांच्या शंकरविजय ग्रंथात नमुद असल्याचे सांगितले जाते. उपनयनादि ब्रह्मकर्माचरणानें सदृश परंतु या ज्ञातीहून भिन्न अशा अनेक ब्राह्मणजाती आहेत. या जातीचे कांहीं लोक सुवर्णादि पंचशिल्पांचा धंदा करीत असतात. म्हणून धंद्यासंबंधानें या जातीचे इतर सुवर्णकारादि पंचशिल्प करणार्‍या जातींशी सादृष्य दिसतें. तथापि पौरोहित्य आणि षटकर्म अधिकार या विश्वब्राम्हण वा पांचाल ब्राह्मणखेरीज इतर सुवर्णादि सुवर्णादि व्यवसाय करणाऱ्या जातीस नाहीं. सुवर्ण, काष्ठ आदी शिल्पी काम करणाऱ्या इतर सोनार जाती या क्षत्रिय व वैश्य वर्णीय जाती आहेत. त्यांचा व विश्वब्राम्हण यांचा काहीही संबंध नाही.

प्राचीन कालापासून आजपर्यंत पौरोहित्यवृत्ति व ब्राह्मणधर्मास विहित असे देव-यज्ञयागादि वैदिक कर्माचा लोप हिंदु राजघराणी यांचे अस्तित्व नष्ट झाल्यामुळें या ब्राह्मण जातीचे अधिकारत्व कमी होत गेले. कालमानपरत्वें इतर ब्राह्मणलोक उदरनिर्वाहार्थ ज्याप्रमाणें शेती व अनेक व्यवसाय करतात त्याचप्रमाणें विश्वब्राह्मणही आज देवयज्ञिशिल्पांचा लोप झाल्यामुळें उदरनिर्वाहार्थ सुवर्णादि शिल्पांचा धंदा करतात असें या जातीकडून सांगण्यांत येतें. या ज्ञातीचा स्वजातीखेरीज इतर कोणत्याहि जाती बरोबर अन्नोदकव्यवहार होत नाहीं. यांत पोटजाती नाहींत. देशपरत्वें महाराष्ट्र, कर्नाटक, तैलंगण, द्राविड असे पोटभेद आहेत. परिचयाप्रमाणें त्यांच्यांत परस्पर रोटीबेटीव्यवहार होतो. या जातींचेच भिक्षुक, वैदिक, ज्योतिषी, शास्त्री वगैरे पूर्वापार असून तेच विवाहादि सर्व संस्कार करतात. दक्षिणेकडे असलेल्या विविध प्राचीन हिंदु राजसत्ता यांच्या काळात राजपुरोहित म्हणून धार्मीक वर्चस्व या ब्राह्मणांकडे होते. तंजावर, विजयनगरसाम्राज्य चोल , चालुक्य , पांड्य साम्राज्य यांच्या काळात या विश्वब्राह्मण कडून शिल्प कलेचा विस्तार झाला. हा या ज्ञातीचा सुवर्णकाळ मानला जातो

पौरोहित्य ,ज्योतिष खेरीज सुवर्ण शिल्पी काम करीत असल्याने ब्राह्मण पोटजातींतील आपापसातील मत्सरामुळे ही ब्राह्मण जात नसल्याचे सांगत त्या वर बहिष्कृत करण्याचा प्रयत्न पेशव्यांच्या काळात केला गेला मात्र नाना फडणवीस आणि अनेक विद्वानानी धर्म शास्त्रार्थ झाल्यानंतर विश्वब्राम्हण ही ब्राह्मण जात असल्याचे मान्य केले. तसेच या जातीस षट्कर्मांचा अधिकार असून ही ब्राह्मण जात आहे या विषयीं जगदगुरू श्रीमच्छंकराचार्य शृंगेरी व पैठण, काशी, विजयानगर, मच्छलीपट्टण, हैद्राबाद, राजमहेंद्री, मद्रास, म्हैसूर वगैरे ठिकाणच्या श्रौतस्मार्तज्ञ पंडितांनीं संमतिपत्रें सनिर्णय जीं जीं दिली आहेत तीं ‘विश्वब्राह्मणांचा इतिहास ‘ संग्रह ६ यांत आढळतात.

या ज्ञातीची मुंबई प्रांतांत बहुतेक ऋग्वेदी आश्वालायन शाखा आहे. व मद्रास प्रांतांत बहुतेक कृष्णयजुर्वेदी आपस्तंभशाखा व अथर्ववेद बौधायन शाखा क्वचित् सामाथवर्ण शाखीहि आहेत. अर्थात चारही वेदशाखा या ज्ञातीत आहेत. परस्परांत परिचयाप्रमाणें अन्नव्यवहार होतो.

या जातींत भृग्वंगिरसंगणांतर्गत १२५ गोत्रें असून गोत्र व प्रवर मिळून ३८२ ऋषी आहेत. याविषयीं वर्णन वसिष्ठपुराणांतर्गत गोत्रप्रवराध्यायांत आहे. तसेच कृष्ण यजुर्वेद तैत्तरीय संहिता श्लोक 4:3:3 मध्ये गोत्र प्रवर,वेदशाखा आणि शिल्पसुत्र दिलेले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक भागांत मुख्य पांच गोत्रें व तैलंगण, द्रविड भागांत १२५ गोत्रें आहेत. भिन्न गोत्रप्रवरांत विवाह होतात. उत्तर भारतात ही जात थोड्या फार चालीरीती भेदासह 20 वेगवेगळ्या जाती नामाने प्रसिद्ध आहे. जंगीड ब्राह्मण, धीमन ब्राह्मण, विश्वकर्मा ब्राह्मण, दैवज्ञ ब्राह्मण सोमपुरा ब्राह्मण, पांचाल ब्राह्मण इत्यादी ठळक नामाने प्रसिद्ध आहे.

विविध कारणांनी दक्षिण भारतातुन मुख्यतः कर्नाटकातुन महाराष्ट्र येथे स्थलांतर स्थायिक झालेले हे मुख्यतः हे शैव पंथीय प्राचीन ब्राह्मण आहेत. कर्नाटक शिरसिंगी येथील दक्षिण कालिका देवी आणि पंचमुखी विराट विश्वकर्मा परमेश्वर हे यांचे मुख्य दैवत आहे.
समाप्त.🙏🏻🙏🏻
सर्व ज्ञाती बांधवांची क्षमा मागून नमूद करतो की, कमी अधिक प्रमाणात ब्राम्हण ज्ञातीची अल्प माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यात उणे अधिक असण्याचा संभव आहे.

संदर्भ – ब्राम्हणोत्पत्ती मार्तंड, ब्राम्हणोत्पत्ती दर्पण, केतकर ज्ञानकोश, विश्वब्राम्हणचा इतिहास. पांचाल ब्राम्हणोत्पत्ती . गुजरात गॅझिटियर, ट्राईबज अँड कास्ट ऑफ बॉम्बे. व इतर ग्रंथ.

संशोधनात्मक संकलन – रविंद्र बारस्कर ( वेदपाठक)